बारामती प्रतिनिधी :बारामती विमानतळावर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अपघाताचे प्रकार घडत आहेत. तरी देखील याकडे गांभीर्याने पाहिलं जात नसल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. गेल्या वर्षभरात बारामतीतल्या विमानतळात वरून प्रशिक्षण घेणारी तीन विमान खाली पडले आहेत. याशिवाय विमानतळावर चालू असलेले गैरप्रकार नेहमी चर्चेत असतात. आज तर बारामतीच्या विमानतळावर कहरच झाला म्हणावं लागेल. विमानाच्या धावपट्टीवरून चक्क मर्सिडीज बेंज धावली आणि ताबा सुटल्यामुळे ती जाऊन धावपट्टीवरून खाली कोसळली. हा प्रकार अद्याप कोणाच्या लक्षात आला नसून प्रशासन या प्रकाराकडे गांभीर्याने पाहणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षभरामध्ये बारामती विमानतळ हे नेहमीच चर्चेत राहिला आहे. बारामतीच्या विमानतळावरून वैमानिकांचे प्रशिक्षण देणारे संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे या विमानतळावरून अनेक शिकाऊ विमान नेहमीच उड्डाण घेत असतात. तीन शिकाऊ विमान जमिनीवर कोसळल्याचे प्रकार बारामतीकरांनी पाहिले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. परंतू याबाबत प्रशासनाने या संस्थेवरती काय कारवाई केली हे अद्यापही बारामतीकरांच्या समोर आलेलं नाही. आज तर बारामतीच्या विमानतळाच्या धावपट्टीवरून मर्सिडीज बेंज कार धावल्याचे निष्पन्न झाले आहे. ह्या मर्सिडीज बेन चा ताबा सुटल्यामुळे ही कार विमानतळाच्या धावपट्टीवरून पुढे असलेल्या गोजुबावी गावाच्या खड्ड्याकडे जाऊन कोसळली. दुपारपर्यंत ही मर्सिडीज बेंज कार तिथेच होती स्थानिक रहिवाशांनी या कारचा सोशल मीडियावर प्रसारित केल्यावर ही बाब समोर आली आहे.