BY : मच्छिंद्र टिंगरे – बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावात राहणारे रामभाऊ सदाशिव करे या बँड व्यावसायिकाने स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान रामभाऊ करे यांच्या आत्महत्येच्या मागे सावकारांचा जाच असल्याचे समोर आले आहे. याबाबत रामभाऊ करे यांच्या पत्नी सोनाली करे यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला असून आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. असे न झाल्यास आंदोलनाचा इशारा होलार समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामभाऊ करे यांच्या पत्नी सोनाली करे या 2020 साली ग्रामपंचायत झारगडवाडी ला सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सोनाली करे यांची ग्रामपंचायत झारगडवाडी च्या उपसरपंच पदी निवड झाली होती. सन 2021 22 च्या पंचायतीच्या विकास कामांमध्ये होणारी कामे गावातील अनेक ग्रामपंचायत सदस्य हे बाहेरील ठेकेदारांच्या नावावर घेत असतात. गावातील काही प्रमुख नागरिकांनी बँड व्यवसायिक असलेल्या रामभाऊ करे यांना गावातील कचरे वस्तीवर असलेल्या दत्त मंदिराचे सभामंडपाचे काम दिले होते. हे सभा मंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी रामभाऊ करे यांच्याकडे भांडवल नव्हते. ज्या पुढार्यांनी रामभाऊला काम दिले त्याच पुढाऱ्यांनी रामभाऊला आहे भांडवल म्हणून व्याजाने पैसे दिले. याशिवाय ज्या ठेकेदाराच्या नावावर काम घेतलेला आहे त्या ठेकेदाराला दोन टक्के कमिशन ही ठरले. मात्र प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्याच्या नंतर या ठेकेदाराने 9% इतके पैसे घेतले. याशिवाय या गाव पुढार्यांनी काम मंजूर करून आणायचे पैसे बिल काढण्याचे पैसे आणि असे वेगवेगळे चार्ज लावून सर्व पैसे बळकावल्याची तक्रार रामभाऊ यांची पत्नी सोनाली करे यांनी दिली आहे.
संबंधित सावकार यांनी दिलेले पैसे परत व्याजाने वसूल केले. याशिवाय हे काम करत असताना रामभाऊ यांनी काढलेले इतर सावकारांकडून व्याजाचे पैसे उगले. त्यामुळे रामभाऊ करे हे कर्जबाजारी झाले. संबंधित पुढाऱ्यांनी कमिशन घेऊन आपली स्वतःची रक्कम काढून घेऊनही व्याजाच्या पैशासाठी रामभाऊ यांच्या मागे तगादा लावला होता. या तागाद्याला कंटाळून रामभाऊ हा गुरुवार दिनांक दहा जानेवारीपासून घरून निघून गेला होता. रामभाऊ करे हा शनिवार दिनांक 11 रोजी रात्री घरी आल्यानंतर त्याने याबाबत सर्व हकीकत आपल्या पत्नीला सांगून दुःख व्यक्त केले होते. त्यानंतर दिनांक 12 तारखेला सकाळी उठून रामभाऊ घराबाहेर पडले आणि त्यांनी स्वतःच्या शेतात गर्फास घेऊन आत्महत्या केली. अशा स्वरूपाची तक्रार रामभाऊ यांच्या पत्नी सोनाली करे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेची चौकशी करत असून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. मात्र दुसरीकडे होलार समाजाच्या वतीने रामभाऊ करे यांना आत्महत्याच प्रवृत्त करणाऱ्या लोकांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. अन्यथा संविधानिक पद्धतीने आंदोलन केले जाईल असा इशारा होलार समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.